नोव्हेंबर १, २०२६
कालचा रविवार दुपारचा वेळ बराच बिझी गेला. आमच्या अमेरिकेतल्या मराठी शाळेतली मुलं घरी जमली होती, दोन आठवड्यांनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दोन गाण्यांची प्रॅक्टिस करण्याकरिता.
प्रॅक्टिस संपली आणि मुलं व त्यांचे पालक घरी परतले. घर पुन्हा एकदा शांत झालं. नेहमीप्रमाणे YouTube वर एखादा पॉडकास्ट लावण्याऐवजी मी माझ्या जुन्या कीबोर्डवर काही दिवसांपासून प्रॅक्टिस करत असलेली गाणी वाजवायचं ठरवलं.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत हा इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड अनेक वर्षं बेसमेंटमध्ये एका कोपऱ्यात ठेवलेला होता. काही महिन्यांपूर्वीच मी त्यावरची धूळ झटकून तो लिव्हिंग रूममध्ये आणला होता.
घरातली शांतता दूर करण्यासाठी मी कीबोर्ड वाजवत असताना सहजगत्या माझ्या मनात लहानपणीच्या शाळेतल्या संगीताच्या तासांच्या आठवणी जाग्या झाल्या…
त्या वेळी संगीताचा तास म्हणजे शाळेतला आणखी एक विषय! करायचा म्हणून करायचा, एवढंच. शिवाय सगळा भर गणित आणि सायन्सवर असल्यामुळे संगीत हा छंद म्हणून जोपासण्यासाठीही फारसा वेळ कधी दिला नाही.
अर्थात, चांगलं संगीत ऐकायला मला नेहमीच आवडत आलं आहे आणि अधूनमधून गाणं म्हणायचं धाडसही मी केलं आहे!
इंजिनिअरिंग कॉलेजच्या निरोप समारंभात ऑडिटोरियमच्या स्टेजवर उभं राहून गुणगुणलेल्या त्या दोन ओळी अजूनही आठवतात… “चलते चलते… मेरे ये गीत याद रखना… कभी अलविदा ना कहना…”
त्यानंतरची काही दशकं संगीताच्या बाबतीत विशेष काही घडलं नाही. मात्र वयाच्या चाळिशीत, अनेक वर्षांनी, माझ्या एका बहिणीकडून इंटरनेटच्या माध्यमातून गाण्याचे काही क्लासेस घ्यायचं ठरवलं.
त्या तीन महिन्यांच्या काळात एवढा कॉन्फिडन्स आला की येथील एका कार्यक्रमात स्टेजवर जाऊन माझं सुरात नसलेलं Karaoke परफॉर्मन्स सादर करण्याचं धाडसही केलं!
त्यानंतर मात्र अनेक वर्षं मी परत गप्प बसलो… अगदी मागच्या वर्षीपर्यंत, जेव्हा मी पुन्हा एक Karaoke ऑडिओ पोस्ट केला!
मात्र गेल्या काही महिन्यांत या जुन्या इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसोबत माझा आत्मविश्वास आणि कम्फर्ट दोन्ही वाढले आहेत. कारण काही झालं तरी माझ्या आवाजापेक्षा कीबोर्डचे सूर नेहमीच चांगले ऐकू येतात! 😊
गेल्या काही महिन्यांपासून संध्याकाळच्या वेळचा हा माझा एक छान companion झाला आहे आणि मलाही त्याची साथ खूप आवडायला लागली आहे!
असाच कीबोर्डवर काही सूर वाजवत असताना बाप्पाचं एक मराठी गाणं वाजवून बघावं असं मनात आलं. माझ्या मनाच्या खूप जवळ असलेलं आणि आयुष्यातल्या प्रत्येक नव्या सुरुवातीच्या वेळी मनाला शांतता देणारं ते गाणं… “तुज मागतो मी आता…”
काल संध्याकाळी असं करता करता खूप वेळ सूर ओळखत गाणं वाजवण्याचा माझा प्रयत्न सुरू होता.
सुरुवातीच्या ‘तुज’ या शब्दाचे सूर शोधतानाच बरीच धडपड करावी लागली आणि त्यानंतर ‘मागतो मी आता’ या शब्दांवरही बराच वेळ गेला.
जेव्हा जेव्हा योग्य सूर लागत होते, त्या वेळी नकळत मन भावनांनी भरून येत होतं.
माझ्या मनातल्या या सुरेल प्रवासाची हीच तर सुरुवात नसेल ना?
अर्थात, मी काही प्रोफेशनल नाही. तरीही माझ्या प्रयत्नांची ही छोटीशी ऑडिओ क्लिप ‘बाप्पांची सेवा’ म्हणूनच पोस्ट करतो आहे. 🙏🏻
ऐकण्याचा आनंद (मानून) घ्या! 😊

प्रतिक्रिया व्यक्त करा